ज्याचा त्याचा व्हॅलेंटाईन...❤️

 शुक्रवारचा दिवस होता. दादाच्या लग्नाची सुट्टी घेतलेली असल्यामुळे विकीला त्या दिवशी लवकर उठून शाळेत जाण्याची घाई नव्हती. त्यामुळे १० वाजले तरी विकी आरामात स्वप्न बघत झोपलेलाच होता. तितक्यात,"विकी १० वाजले, उठ लवकर, लग्नाला जायचंय ना? ११.३० ची गाडी आहे. लवकर आवरून घे. नंतर गाडी नाही मिळणार परत." असा आईचा आवाज मोठ्याने विकीच्या कानावर धडाडला. लगेच स्वप्न बघण्यात गर्क असलेला विकी खडबडून झोपेतून जागा झाला. त्याने लगेच आवरून घेतले आणि आईसोबत तो लग्नाला जाण्यास निघाला. आधीच उशीर झाला असल्याने दोघे भराभर पावलं टाकत स्टेशनला पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. तितक्यात जाताना रस्त्यात शाळेवर राष्ट्रगीत चालू होते. राष्ट्रगीताचे शब्द कानी पडताच विकी जागेवरच स्तब्ध उभा राहिला. त्याला लग्नाला जाण्याची घाई, ट्रेन, स्टेशन कशाचेच भान नव्हते. आधीच उशीर झालेला त्यात विकी असाच स्तब्ध उभा राहिलेला पाहून विकीची आईने ," अरे काय इथेच उभा राहिलास. जायचंय ना? चल भरभर." असे म्हणून विकीला तेथून निघण्यास सांगितले. परंतु आईच्या त्या शब्दांचा विकीच्या कानावर काहीच परिणाम पडत नव्हता. त्याला त्या राष्ट्रगीताच्या स्वरांव्यतिरिक्त बाकी काहीच ऐकू येत नव्हते. इतकं काही बोलूनही विकी काहीच प्रतिक्रिया देत नसलेलं पाहून आईला राग आला. त्या रागाच्या भरात आई विकीजवळ आली आणि विकीचा हात धरून फरफटत त्याला घेऊन जाऊ लागली. तरी विकी आईचा तो हात झिडकारून तसाच उभा राहिला. त्यासमयी विकीच्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहत होत्या. थोड्यावेळात राष्ट्रगीत संपले. विकी परत भानावर आला. त्याने घड्याळात वेळ बघितली. फक्त पाच मिनिटं बाकी होती गाडी सुटायला. तो भरभर पावलं टाकीत आईसोबत स्टेशनवर पोहोचला. त्याने दुरूनच गाडी बघितली. लगेच तो तिकीट काढायला गेला. पण तिकीटाला भली मोठी रांग होती. त्यात विकीचा नंबर येणार आणि विकी तिकीट काढणार इतक्यात ट्रेनचा भोंगा वाजला आणि ट्रेन निघून गेली. लगेच विकीच्या चेहऱ्यावर नैराश्य आले. त्याने तशाच नैराश्याने आईकडे बघितले. आईचा चेहरा तर रागाने फुगून लाल झाला होता. तिच्या चेहऱ्यावर घरी जाऊन आपल्याला किती फटके मिळणार आहेत हे विकीला स्पष्ट दिसत होते. शेवटी दोघे परत घरी जाण्यास निघाले. रस्त्याने जाता जाता ती शाळा नजरेस पडली. त्यावेळी,"मगाशी इकडे उगाच उभा राहिला होतास ना?आता अजून पुढचे २ तास तू इथेच थांब आणि मग घरी ये." असे रागाच्या भरात आईने विकीला ओरडून सांगितले. विकीने मान खाली आणि दिलेली शिक्षा मान्य केली. आईचे विकीवर प्रेम नव्हते असे नाही. ज्या मायेनं ९ महिने पोटात जीव निर्माण करून त्याचा सांभाळ केला. त्यासाठी अनेक यातना सोसल्या. त्या आईचं आपल्या मुलावर प्रेम नाही असे कसे होईल. परंतु मुलांना काही गोष्टी शिकवण्यासाठी कधी कधी आईला देखील मनाला कठोर बनवावे लागते. आई घरी जाऊनही कधी विकी परत घरी येतोय ह्याची आईला हुरहूर लागली होती. इकडे "लोकांना आपल्या देशाबद्दल आस्था का वाटत नाही? लोक २ मिनीटसुद्धा राष्ट्रगीतासाठी उभे का राहू शकत नाहीत? लोक खरंच आपल्या दैनंदिन व्यवहारात इतकी व्यस्त झालेली आहेत का की त्यांना देशासाठी देण्यास २ मिनिट सुद्धा नाहीत? तिकडे आपले सैनिक सीमेवर जीवाची पर्वा न करता ह्या भारतमातेसाठी लढत असतात. परंतु ह्याची जाणीव आपल्याला कधीच का भासत नाही?" अश्या अनेक प्रश्नांनी विकीचे मन चक्रावले होते. शेवटी तसेच चक्रावलेलं मन घेऊन विकी तेथून निघून गेला. त्या वेळी विकीचे वय १२ वर्षाचे होते.
 विकीच्या आईचे देशावर प्रेम नव्हते, देशाबद्दल आस्था नव्हती असे नाही. तिने तर तिचे संपूर्ण आयुष्यच सैनिकाला अर्पण केले होते. विकीचे वडील भारतीय सैन्यदलात कर्नल म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मनात प्रचंड देशभक्ती भरलेली होती. त्यांचे देखील ह्या देशावर भरभरून प्रेम होते. उंच, धिप्पाड आणि चेहऱ्यावर प्रचंड तेज अशी त्यांची पर्सनॅलिटी होती. इंडियन आर्मीच्या त्या गणवेशात ते ठळक उठून दिसत होते. विकी ३ वर्षांचा होता तेंव्हा १९९९च्या भारत - पाकिस्तान मध्ये झालेल्या कारगिल युद्धात विकीच्या वडिलांना वीरमरण आले. त्यांच्या जाण्याने विकीच्या आईवर फार मोठे दुःखाचे आभाळ कोसळले होते. तरी आपले दुःख कसेबसे आपल्या पदरात घेऊन विकीच्या आईने स्वतःला सावरले होते.
 आई जरी त्या दिवशी विकीवर रागाने चिडली होती तरी आईला विकीचं एवढ्या लहान वयातच देशावर असलेलं प्रेम पाहून फार कुतूहल वाटलं. मात्र इतक्या लहान वयातच विकीला भासत असलेली देशभक्ती पाहून विकीच्या आईला एक भलतीच काळजी लागून राहिली होती. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या म्हणीप्रमाणे विकीच्या मनात असलेली ही देशभक्ती आणि भारतमातेवरील प्रेम पाहून मोठेपणी विकीदेखील त्याच्या वाडीलांप्रमाणेच आपलं जीवन देशाला अर्पण करणार हे स्पष्ट दिसून येत होते. विकीच्या आईला हे कदापी होऊ द्यायचे नव्हते. विकीची ती देशभक्ती आईला मनात कुठेतरी भीती घालू पाहत होती.आधीच विकीच्या वडिलांच्या वीरमरणाने एकटी पडलेल्या विकीच्या आईला आता अजून कोणाला गमवायचे नव्हते. त्यामुळे आता विकिचं मन त्याच्या देशभक्तीपासून कसे दुसरीकडे वेधता येईल हाच विचार सतत तिच्या मनात चालू असायचा.
 इकडे विकी आणि विकीची देशभक्ती शुक्ल पक्षातील चंद्रप्रमाणे कलेकलेने वाढत होती. विकी मोठा होऊ लागला. १७व्या वर्षी महाविद्यालयात प्रथमच त्याने प्रवेश केला. बाकी सर्व ठिकाणी हुशार असणारा विकी अभ्यासात मात्र नेहमी कमी पडत असे. महाविद्यालयात जाऊनही विकीच्या देशभक्तीमध्ये मात्र तिळमात्रही फरक पडला नाही. त्याच्या मनातील देशाविषयी असणारे प्रेम पाहून विकीच्या वर्गशिक्षकांनी विकीला 'नॅशनल सर्व्हिस स्कीम' (एन एस एस) मध्ये भाग घेण्यास सुचविले. एन एस एस मध्ये विकीला त्यांच्यासारखाच देशाबद्दल आस्था असणारा एक तरुणवर्ग भेटला. विकी आणि त्याचे मित्र सर्व ग्रुपने देशप्रेमाची भावना सर्वांमध्ये जागृत करण्यासाठी विविध कार्यक्रम करत असत. विकीच्या ग्रुपमध्ये मनाली नावाची एक देखणी मुलगी होती. ती मुलगी विकीला फार आवडत होती. अर्थातच तरुण वयात आलेल्या विकीला महाविद्यालयात जाऊन एखादी तरुण मुलगी आवडणं करणं ह्यात काही नवल नव्हतं. विकीच्या ग्रुपमध्ये सर्वांना ही गोष्ट माहीत होती. पण ती समोर आली की विकीची बोबडीच वळत असे. ते पाहून विकीचे मित्र विकीवर हसून नेहमी त्याची खिल्ली उडवत असत. विकीला त्याचे मित्र दरवेळी मनालीसमोर त्याचं प्रेम व्यक्त करायला सांगत असत मात्र तिला नाही आवडलं तर मैत्री देखील संपून जाईल ह्या भीतीने विकी व्यक्त करायला घाबरत होता. एक दिवस लेक्चर चालू असताना अभ्यासाची मुळीच आवड नसणारा विकी त्याला मनालीबद्दल वहीच्या मागे काहीतरी प्रेमकविता लिहीत बसला होता. तितक्यात सरांनी विकीचं लक्ष नसलेलं बघून त्याला उठवलं आणि काही प्रश्न विचारले. वर्गात काय चालू आहे याकडे काहीच लक्ष नसल्याने विकीला कुठल्याच प्रश्नांची उत्तरं येत नव्हती. त्याने तर हे प्रश्नच पहिल्यांदा ऐकले होते. तरीही सगळ्या वर्गासमोर आपली फजिती नको व्हायला यासाठी मुद्दाम वहीची पानं चाळत विकी आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय असं दाखवत होता. तितक्यात सरांनी विकीची वही त्याच्या हातातून खेचून घेतली आणि त्यात काय लिहलं आहे ते संपूर्ण वर्गासमोर वाचून दाखवत होते. त्यात सरांनी,"खूप काही सांगायचंय मनाली तुला खूप काही सांगायचंय, माझ्या मनातील ह्या भावनांना ओठांवरील शब्दांत उतरवायचंय." अशी विकीच्या कवितेतील पहिलीच ओळ वाचली आणि सरांसकट संपूर्ण वर्गाला हसू आवरेनासे झाले. तरी वर्गाचं संतुलन राखण्यासाठी सरांनी विकीवर किंचित रागाचा आव आणून विकीला वर्गातून बाहेर निघून जाण्यास सांगितले. विकीला आता वर्गाच्या बाहेर जाण्याच्या शिक्षेची सवय झाली होती त्यामुळे त्याला त्याबद्दल काहीच वाटलं नाही पण आपलं मनोगत ह्या शिक्षेच्या माध्यमातून फक्त मानालीच नाही तर संपूर्ण वर्गासमोर चांगलंच व्यक्त झालं होतं त्यामुळे आता लेक्चर संपल्यावर काय होईल ह्या विचाराने त्याचं मन अस्वस्थ होतं. त्याच्या मनात सतत तोच विचार घोळत होता. तितक्यात लेक्चर संपल्याची बेल वाजली. लेक्चर संपलं आणि सर निघून गेले. आणि पुढच्या लेक्चरसाठी विकी वर्गात शिरला. विकी आल्या आल्या सर्वजण विकीला मनालीच्या नावाने चिडवू लागले. त्याने त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि सर्वप्रथम मानालीकडे एक झलक टाकली. मनालीची मान किंचित झुकलेली होती आणि विकिकडे बघत ती गालातल्या गालात हसत होती. त्या वेळी तिचा चेहरा थोडा लाजरा झाल्यासारखा भासत होता. मनालीच्या त्या लाजऱ्या चेहऱ्याकडे बघून विकीला न बोलताच आपल्या प्रेमाचे उत्तर मिळालं होतं. आता विकिमध्ये थोडी हिंमत आली. कॉलेज सुटलं आणि घरी जात असताना विकीने मनालीला कॉलेजच्या जवळ असलेल्या चहाच्या टपरीवर थांबायला सांगितले. विकी मनालीची वाट बघत टपरीवर उभा होता. तितक्यात मनाली तिथे हजर झाली. लगेच विकीने चहाची ऑर्डर दिली आणि तो मनालीसोबत बाजूच्या फळीवर बसला. बाहेर पाऊस पडत होता. जमीन भिजून गेलेली असून सर्वत्र मातीचा वास पसरत होता. थंडगार हवा येत होती. वातावरण अगदी रोमँटिक झालं होतं. विकीला आता सगळं काही आयतं मिळालं होतं, काही मिळवायचं होतं ती फक्त प्रेम व्यक्त करायची हिंमत. विकी तिच्या डोळ्यांतील प्रेमरूपी समुद्रात पूर्णपणे बुडून गेला होता. तितक्यात,"दोन कटिंग" म्हणून चहावाला जोरात ओरडला आणि त्याने चहाचे ग्लास समोर केले. तिच्या डोळ्यांत हरवलेला विकी झोपेतून खडबडून उठल्यासारखा भानावर आला. विकीने चहा घेत घेत आपले फिल्मी डायलॉग मारायला सुरुवात केली. "मनाली, मला बऱ्याच दिवसांपासून तुला काहीतरी सांगायचंय. ह्या चाहतून बाहेर येणाऱ्या वाफा जश्या हवेत विलीन होत आहेत अगदी तसंच मला तुझ्या हृदयात विलीन व्हायचं आहे. मला तुला घेऊन तो प्रवास करायचा आहे जिथे आपल्याला बोलण्यासाठी वेळ कमी नाही पडणार आणि तुला घरी जाण्याची घाई नसेल. जिथे काळीज माझं अस्वस्थ असेल तर ठोके तुझ्या हृदयात वाढू लागतील. जिथे"... "बस बस बस. कळलं मला तुला काय म्हणायचंय" असं म्हणून तिने विकीचं बोलणं थांबवलं आणि तू जोरजोरात हसू लागली. हसून झाल्यावर," अरे वेड्या मला तर हे सगळं तेंव्हाच कळलं होतं जेंव्हा तू आपले एन एस एस चे कॅम्प झाल्यावर घरापर्यंत सोडायला यायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी ह्या टपरीवर तुझे मित्र तुला माझ्यावरून चिडवत असायचे. मी तर केवळ वाट बघत होते कधी हा डरपोक मनातल्या भावना व्यक्त करतोय." असं म्हणून ती परत हसू लागली. विकीला चाललेला प्रकार हा काहीच कळत नव्हता. मनालीने तिच्या हातातला ग्लास बाजूला ठेवला आणि विकीच्या हातातला ग्लास हातात घेऊन," ह्या ज्या चहातून निघणाऱ्या वाफा आहेत ना, त्यांना ह्या हवेने तिच्यात विलीन होण्यासाठी स्वीकारलं आहे." असं म्हणाली. आता मात्र विकीला मनालीने आपल्या प्रेमाला स्वीकारले आहे हे लक्षात आलं. विकीचा आनंद आता गगनात मावेनासा झाला होता. आनंदाच्या भरात विकीने," अजय अजून ८ कटिंग घेऊन ये रे!" असं म्हणत सगळ्या ग्रुपला पार्टी दिली. 
 हळू हळू विकी आणि मनालीचे प्रेमसंबंध वाढत वाढत गेले. कॉलेज सुद्धा आता संपत आलं होतं. परीक्षा संपली. आपण ज्या ग्रुप मध्ये एकत्रितपणे तीन वर्षे घालवली त्या सर्वांना आता निरोप देण्याची वेळ आली होती. आता प्रत्येकजण आपापल्या मार्गाने करिअरचा विचार करत होता. त्यातले कोणी शास्त्रज्ञ तर कोणी प्रोफेसर बनणार होते. मनाली एक उत्तम वक्ता होती. त्यामुळे तिने न्यूज रिपोर्टर बनायचं ठरवलं. विकिचं लहानपणापासून देशावर प्रेम असल्यामुळे त्याने सैन्यदलात भरती व्हायचं ठरवलं. त्याने त्यासाठीच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. मात्र विकीने ही गोष्ट आईपासून लपवून ठेवली. कारण आपली आई आपल्याला सैन्य दलात भरती होण्याची कधीच परवानगी होणार नाही हे त्याला माहित होतं. पण नंतर परीक्षेचा निकाल आला. आता मात्र आपलं मनोगत व्यक्त करणं हे विकिसमोर एक मोठं आव्हान होतं. विकी आता दिवस रात्र ह्याच विचारात गुंतलेला होता. विकीला सतत कुठल्यातरी विचारात पाहून विकीच्या आईला नक्की भानगड काय आहे ते काहीच लक्षात येत नव्हतं. एक दिवस विकी असाच घरी न्याहारीला बसलेला असताना विचारात मग्न झालेला आईला आढळला. आईला न राहवल्याने तिने विकीला त्याचे कारण विचारले. विकी काहीच न बोलता तेथून सरळ रूम मध्ये घेऊन गेला. ह्याच्या सर्व गोष्टी मनालीलाच ठाऊक असतात म्हणून विकीच्या आईने विकी नसताना मनालीला बोलावून घेतले. मनालीने चालू असलेला सर्व प्रकार विकीच्या आईच्या कानावर घातला. विकी सैन्यदलात भरती होतोय हे कळताच आईच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या आणि ती धाडकन खाली कोसळून बेशुद्ध पडली. मनालीने लगेच विकीच्या आईच्या तोंडावर पाणी शिंपडून तिला जागे केले आणि पिण्यास पाणी दिले. तितक्यात विकी घरी आला. घरातले सर्व दृश्य पाहून घडलेला सर्व प्रकार लगेच त्याच्या लक्षात आला. तो आईजवळ आला आणि आईला जवळ घेऊन तो आईला समजवू लागला. "बाळा, तू तुझ्या आईच्या रक्षणासाठी चाललास खरा, पण मी सुद्धा तुझी आईच आहे ना? तू तिचा विचार करत असताना माझा विचार का नाही केलास माझ्या लेका? तुझ्याशिवाय माझा इथे जीव तरी लागेल का बाळा? तू एक काम कर. आधी माझा जीव घेऊन मला मोकळ कर. आणि मग जिथे जायचं तिथे खुशाल जा. आधी नवऱ्याला आणि आता तुला सुद्धा नाही गमवायचंय मला." असं म्हणत विकीची आई आक्रोश करू लागली. विकीला आईबद्दल प्रेम नव्हते असे नाही. पण विकीला आता त्याचं ध्येय गाठायचं होतं. त्यामुळे आईच्या भावनांना न जुमानता तो तिथून निघून गेला. विकीला काहीही झालं तरी आता त्याचा निर्णय बदलायचा नव्हता. त्याने मिनिटभर आपले डोळे मिटले. त्याने लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्या स्वप्नांना समोर ठेवून केलेला प्रवास आठवला आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्यानंतर तो परत बाहेर आला. आई आणि मनाली तिथेच बसलेले होते. त्यांना उद्देशून "उद्या सकाळी ११.०० ची गाडी आहे. मला लातूरला जावं लागेल. परत कधी येणं होईल ठाऊक नाही." असे बोलून तो परत खोलीत निघून गेला. मुलाच्या तोंडचे ते शब्द ऐकता विकीची आई पुन्हा आक्रोश करू लागली. ती रात्र मनाली आणि विकीची आई दोघांनीही रडत रडतच घालवली. 
 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून विकीने सर्वप्रथम मंदिरात जाऊन देवाला नमस्कार केला. नंतर कपाटातील सर्व कपडे काढले आणि त्याने आपली बॅग भरायला घेतली. तो आता जाण्याची तयारी करू लागला. विकीच्या आईने विकीसाठी सकाळी पहाटे उठून लाडू बनवले होते. ते लाडू तिने विकीला जातेवेळी दिले. विकी आता घरातून जायला निघत होता. आईने आणि मनालीने जाण्यापूर्वी विकीला ओवाळून विकीची आरती केली. नंतर मनालीला प्रेमलिंगन देऊन आईला नमस्कार करायला विकी खाली झुकला. आईने आशीर्वाद देऊन विकीच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला आणि डोळ्यातील अश्रू पुसत पुसत," ११.०० ची गाडी आहे. शाळेच्या मार्गाने स्टेशनवर जाऊ नकोस. राष्ट्रगीत चालू झालं तर तिथेच उभा राहशील." असं हसत हसत म्हणून त्याची पाठ थोपटली. त्यानंतर विकी तेथून निघून गेला तो थेट गाडीत बसला. सर्वांचे स्मरण करत करत विकी आपलं ध्येय गाठण्यास निघाला. लातूरात गेल्यावर तेथील सीआरपीएफ (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स) ट्रेनिंग सेन्टरमध्ये त्याने प्रवेश केला. तिथे जाऊन विकीने सैनिकी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. असिस्टंट कमांडंट अनिल कुमार  ह्यांच्या हाताखाली विकी प्रशिक्षण घेत असे. असिस्टंट कमांडंट अनिल कुमार हे केवळ एक उत्तम प्रशिक्षक नसून एक उत्तम असे मार्गदर्शक देखील होते. ते सर्व सैनिकांना आपलंसं समजून त्यांना प्रशिक्षण देत असत. ते त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना वयक्तिक गोष्टींमध्ये देखील योग्य मार्गदर्शन करत असत. तेथून शिक्षण पूर्ण झाल्यावर विकीची सीआरपीएफ मध्ये निवड झाली. सीआरपीएफ  ही एक भारतीय पोलीस सैन्यदळातील एक मोठी संस्था आहे. ह्यामध्ये २४६ बटालियन असून ३ लाखापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. देशातील कायदे सुव्यवस्था आणि तसेच दहशतवादमुक्त भारत हे सीआरपीएफचे मुख्य उद्दिष्ट आहे. सीआरपीएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून जम्मू आणि काश्मीर झोनमध्ये विकी कार्यरत होता. जम्मू आणि काश्मीर झोन हे देशातील चार सीआरपीएफ झोन्सपैकी एक महत्त्वपूर्ण झोन आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर झोन हे दहशतवाद्यांसाठी एक लक्ष्यबिंदू देखील आहे. देशातील बरेचसे दहशतवादी हल्ले ह्या झोनमध्ये आढळून येतात. तिथे डायरेक्टर जनरल राजीव भटनागर ह्यांच्या नेतृत्त्वाखाली विकी काम करत असे. डिजी राजीव भटनागर हे बॅच १९८३ चे आईपीएस ऑफिसर होते. डिजी राजीव भटनागर हे देखील मुलांना योग्य तसे सैनिकी मार्गदर्शन करत असत. ते मूळचे बुलंदशहर, उत्तरप्रदेश येथील असून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्या होत्या. "ज्या मातीत आपण जन्माला आलो, ज्या मातीत लहानाचे मोठे झालो, त्या मातीचे ऋण फेडण्यात काहीच कसर होऊ देऊ नका. कारण उद्या आपला जीव जरी गेला तरी आपला देह ह्याच मातीत विलीन होऊन जाणार आहे" हे त्यांचे विचार नेहमीच ते आपल्या सैनिकांना देत असत. डिजी भटनागर हे विकीसाठी एक आदर्श बनले होते. नेहमी त्यांचा आदर्श समोर ठेवून विकी प्रत्येक कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडत असे. 
 विकी जरी इथल्या वातावरणात रुळला असला तरी त्याला आई आणि मनालीचा विसर पडला नव्हता. तो नेहमी आई आणि मनालीसाठी जम्मू आणि काश्मीर वरून पत्र पाठवत असे. मनालीदेखील आईला एकटेपणा भासू नये म्हणून विकीच्याच घरी असायची. एक दिवस विकी आपल्या राहोटीमध्ये बसला होता. जानेवारी महिना चालू होता. त्याला आई आणि मनालीची आठवण येत होती. काही काम नसलेली वेळ पाहून विकी आई आणि मनालीसाठी पत्र लिहिण्यास बसला. १४ फेब्रुवारी जवळच आलेली असल्याने तो आईसाठी आणि मनालीसाठी ह्यावेळेस पत्राबरोबर व्हॅलेंटाईन गिफ्ट सुद्धा पाठवणार होता. मनालीसाठी न्यूज रिपोर्टिंगसाठी एक छानसा कोट आणि आईसाठी रेडिओ असे त्यांना रुचेल असे गिफ्ट्स त्याने विकत घेतले होते. त्याने पत्र लिहले आणि त्यासोबत गिफ्ट्स पाठवून दिले आणि तो तिथून बाहेर आला. तितक्यात डिजी भटनागर यांनी सर्वांना कॉन्फरन्स साठी बोलवले. दरवर्षीप्रमाणे जम्मू - श्रीनगर आणि श्रीनगर - जम्मू चे ताफे निघणार होते. सीआरपीएफ जवान हा जम्मू ते श्रीनगर आणि श्रीनगर ते जम्मू असा २७१ किमी प्रवास नेहमीच करत असतात. ह्या प्रवासाला 'भयंकर २७१' असेही ओळखले जाते. ह्या प्रवासासाठीच कॉन्फरन्स ठरली होती. हा प्रवास बर्फवृष्टीवर अवलंबून असतो. ठरल्याप्रमाणे प्रवास सुरू झाला. अति बर्फवृष्टीमुळे ह्या वेळी रस्ता बंद पडला होता. त्यामुळे ४ फेब्रुवारी पर्यंत नेहमीच्या ७ फेऱ्यांऐवजी फक्त ३च फेऱ्या होऊ शकल्या. नंतर १४ फेब्रुवारीला पहाटे ३.०० वाजता सीआरपीएफचे जवान जम्मू - काश्मीर प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढले. एकाचवेळी ७८ बसेस २५४७ जवानांना घेऊन प्रवासासाठी रवाना झाल्या. ७८ बसेसचा हा ताफा काझीगुंड येथे पोहोचला. तितक्यात त्यातील १६ गाड्या वेगळ्या झाल्या. त्याच वेळी दुपारी २ वाजून ३८ मिनिटांनी १६ मोबाईल बंकर्स देखील ताफ्यात सामील झाले. रस्त्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने हे मोबाईल बंकर्स आयोजित केले होते. प्रवास चालू असताना बाहेरील वाहनांना त्या मार्गाचा वापर करण्यास परवानगी नसते. पण २००३ पासून नागरिकांना असुविधा होऊ नये म्हणून त्यांना देखील ह्या मार्गाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली. ३ वाजून १५ मिनिटांनी हा ताफा पुलवामा जिल्ह्यातील आवंतीपुरामधील लाटुमोड जंकशन येथे येऊन पोहोचला. तितक्यात एक मारुती इको व्हॅन काकपोरा - लेलहरच्या बायपास रोडने ताफ्यात सामील झाली. त्यानंतर एकेक बसेसना ओव्हरटेक करत करत ती मारुती इको व्हॅन नेमकी विकी ज्या बस मध्ये बसला होता त्याच पाचव्या बसपर्यंत येऊन पोहोचली. पाचव्या बस मध्ये एकूण ४० जण बसले होते. बसमध्ये सर्व जवान गाण्यांच्या भेंड्या खेळत होते. विकीवर आता गाणं गाण्याची वेळ आली होती. पण विकीला नेमकं आलेल्या अक्षरावरून कुठलं गाणंच सुचत नव्हतं. विकीला गाणं सुचत नसलेलं पाहून सर्व जवान विकीवर हसू लागले आणि त्यांनी अंक मोजण्यास सुरवात केली. सर्व जवान विकीला चिडवत,"टिकटिक वन, टिकटिक टू, टिकटिक थ्री" असं म्हणत होते तितक्यात बसला ओव्हरटेक करत करत त्या मारुती इको व्हॅनने जोरात बसला धडक दिली आणि गाडीसोबत पाचव्या बसचा मोठा विस्फोट झला. तो स्फोट इतका भयंकर होता की विकिसह त्या बस मध्ये बसलेले सर्वच जवान शहीद झाले. तसेच त्या बसच्या पुढे असणारी सहावी बस सुद्धा हादरून गेली आणि त्यातले पाच जवान जखमी झाले. इतकंच नाही तर ह्या विस्फोटात आरओपी (रोड ओपनिंग पार्टी) मधील एक कर्मचारी देखील शहीद झाले. झालेल्या स्फोटाचा आवाज ऐकून उपस्थित असलेल्या सर्वांचेच कान सुन्न झाले. लगेच सर्वांना तात्काळ इस्पितळात नेण्यात आले. लगेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यां हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन हल्ल्याची शहानिशा करण्यास सुरुवात केली. माहिती अंतर्गत धडकणाऱ्या त्या मारुती इको व्हॅन मध्ये जवळ जवळ ८० किलो आरडीएक्स असून ह्या हल्ल्यामागे 'जैश-ए-मोहम्मद' नामक दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती मिळाली. हा भारतातील सुसाईड बॉम्बरने केलेला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला होता.
 इथे बरोबर १४ फेब्रुवारीला मनाली आणि आईला विकीचे पत्र आणि पत्रासोबत पाठवलेले व्हॅलेन्टाईन गिफ्ट्स विकीच्या घरी येऊन पोहोचले. नेहमीप्रमाणे आईने डिलिव्हरी बॉयला घरी बोलवून पाणी आणि चहा दिला. आपल्यासाठी न्युज अँकरिंगकरता मिळालेला कोट पाहून मनाली एकदम खूष झाली. तसेच आपल्यासाठी विकीने पाठवलेला रेडिओ पाहून आईसुद्धा खूप खुष झाली. दोघींचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. तितक्यात मनालीला ऑफिसमधून फोन आला. एक अतिमहत्त्वाची बातमी सादर करण्यासाठी तातडीने मनालीला तिच्या बॉसने बोलावणं धाडलं. तातडीने ऑफिसला जावं लागल्यामुळे मनालीला त्या आनंदाचा भोग फार क्षण घेता आला नाही. ऑफिस मध्ये गेल्यावर नेमकी घटना मनालीच्या कानावर पडली. मनालीचे शरीर थरथर कापू लागले. तिच्या डोळ्यांवाटे अश्रुधारा वाहू लागल्या. अँकरिंग करावे तर तोंडातून एकही शब्द फुटेना. तिची ती मनस्थिती पाहून तिच्या बॉसने तिला पिण्यास पाणी दिले आणि घरी जायला सांगितले. रडत रडत घरी आलेल्या मनालीला पाहून आई घाबरली. तिने मनालीला जवळ घेतलं आणि रडण्याचं कारण विचारलं. तेंव्हा,"टीव्ही लावा" म्हणून रडत रडत तिने आईला सांगितलं. "अगं पण इतकं रडायला झालंय तरी काय?" म्हणून आईने मनालीला विचारलं. "तुम्ही लावा ना. सगळं कळेल तुम्हाला आधी टीव्ही लावा." असं म्हणून मनाली परत रडू लागली. मनालीला इतकं रडताना विकीच्या आईने आजपर्यंत पाहिलं नव्हतं. त्यामुळे अजून जास्त प्रश्न न करता लगेच उठून तिने टीव्ही लावला. तितक्यात 'पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद' अशी हेडलाईन तिला दिसली. शहीद झालेल्या ४० जवानांमध्ये विकी एक  असल्याचं तिच्या लक्षात आलं. आधीच युद्धामध्ये आपल्या पतीने पत्करलेल्या वीरमरणाने तिचं हृदय तुटलं होतं. त्यामुळे आता तिला मिळालेला हा धक्का तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होता. तिने क्षणभर आपले डोळे मिटले. तिने आपलं हृदय शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तिला काही करता ते जमत नव्हतं. शेवटी गळा काढून ती ओक्षाबोक्शी रडू लागली. मनालीने तर तिचा प्रवास सुरु होण्याआधीच आपल्या जोडीदाराला गमावलं होतं. रडून रडून दोघींचाही घसा कोरडा पडला होता पण त्यांच्या डोळ्यांतील अश्रुधारा काही थांबत नव्हत्या. तितक्यात काही कर्मचारी तिरंग्यात गुंडाळून विकीचं प्रेत घरी घेऊन आले. आणि विकीचा सीआरपीएफचा गणवेश त्यांनी आईच्या हातात दिला. विकीचा तो पार्थिव देह पाहून तर आई अजूनच रडू लागली."मी मागच्या जन्मी कोणती पापं केली होती म्हणून आज मला देवाने ही अशी शिक्षा दिली. तू माझा नवरा नेलास आणि आता माझ्या मुलाला पण घेऊन गेलास. नक्की कसली शिक्षा देतो आहेस तू?" असं म्हणत ती आक्रोश करू लागली. मनाली देखील पूर्णतः खचून गेली होती. पण मनाली मनाने खंबीर होती. ती उठली. तिने दोन्ही हातांनी आपले डोळे पुसले. आणि जमलेल्या सर्वांना उद्देशून,"मंडळी, आज आपल्या सर्वांमध्ये बागडणारी, मिसळून राहणारी एक व्यक्ती आज आपल्यातून निघून गेली आहे. पण कोणीही खचून जाऊ नका. विकीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या देशासाठी वीरमरण पत्करले आहे. आज विकी जरी आज आपल्यात नसला तरी आपल्या हृदयात सदैव तो नांदत आहे. जेंव्हा जेंव्हा आपल्याला आपला देश, आपली भूमी, आपला तिरंगा दिसेल तेंव्हा तेंव्हा आपोआपच आपणास विकीचे स्मरण होईल. आज विकीने त्याच्या आईला, त्याच्या जोडीदाराला, त्याच्या मित्रांना तसेच त्याच्या आप्तेष्टबंधूंना पुन्हा एकदा ताठ मानेने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आज आपल्या सर्वांना अभिमान आहे की आपल्या विकीने देशासाठी आपले बलिदान दिले आहे.  त्यामुळे आपण सर्वांनी खचून न जाता विकिप्रमाणेच देशासाठी शक्य तेवढे करण्याचा प्रयत्न करू." असे सांगून तिने आईचं आणि सर्वांचं मन शांत केलं. त्यानंतर विकीच्या अंत्यविधीची वेळ येऊन ठेपली. मनाली आणि आईला विकीचा देह नेताना आता बघवत नव्हते. त्या दोघीही आक्रोश करून ओक्षाबोक्शी रडू लागल्या. नंतर जड अंतःकरणाने आई आणि मनालीने विकीला शेवटचा निरोप दिला.
 विकीचे अंत्यसंस्कार होऊन दोन महिने झाले. तरीसुद्धा मनाली आणि आईला घरी चैन पडत नसे. मनालीने रात्री कामावरून घरी यावे आणि दोघींनी रात्री विकीचे गुणगान गात गात आसवं गाळावीत हाच त्यांचा दिनक्रम असे. मनालीचं मन रोज सकाळी कामाला जातेवेळी विकीने दिलेला कोट घालताना विकीच्या आठवणीने भरून येत असत. विकीची आई दिवसभर आपल्याला व्हॅलेंटाईन गिफ्ट मिळालेला रेडिओ ऐकत ऐकत विकीच्या आठवणीत रमून जात होती. मनाली रोज सीआरपीएफच्या गुन्हेगाऱ्यांचा शोध घेत घेत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत होती. बरेचसे बिकाऊ मिडिया सीआरपीएफ बलिदानासंबंधी सत्य परिस्थिती माहीत असूनही लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. मनाली मात्र ह्या सगळ्यांना सामोरं जात जात लढत होती आणि लोकांना योग्य ती बातमी पोहोचवत होती. विकीचा आत्मा तर तयार त्याच्या मातीमध्ये विलीन करून घेतला होता. १४ फेब्रुवारी हा जागतिक प्रेम दिवस (व्हॅलेंटाईन डे) म्हणून मानला जातो. मात्र भारतात ह्या दिवसाची वेगळी ओळख तयार झाली होती. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगभरात व्हॅलेन्टाईन डे साजरा केला जातो. मात्र शेवटी विकिच त्याच्या ह्या प्रेमाच्या परीक्षेला पात्र ठरला. जणू काही त्याने देखील कुठेतरी त्याच्या देशाशी त्याची गाठ बांधून ठेवली होती आणि म्हणून त्याने आपल्या मातीच्या सुगंधात स्वतःचा जीव मिसळून आपलं प्रेम व्यक्त केलं होतं.

Comments