रॉंग डिलिव्हरी
मार्च नुकताच येऊन ठेपला होता. त्यात एप्रिल ची कामं अजूनपर्यंत पेंडिंग होती. कंपनीने मार्चसाठी नवीन टार्गेट सेट करून चितळे सरांना दिलं होतं. मार्चसाठी नवीन नवीन कुठल्या योजना यशस्वी ठरतील याची सुद्धा माहिती कंपनीने चितळे सरांना दिली. तसेच जुनं काम दोन दिवसात झालं पाहिजे अशी ताकीद सुद्धा दिली. "पनवेलचे १०००, कामोठ्याचे ५००, नवीन पनवेलचे ५००, करंजाडे ५००, खांदा कॉलनी १५०,आणि काळंबोली ३५०. एकूण ३००० पर्सल्स आहेत. आपल्याकडे दोन दिवस आहेत, पाच माणसं आहेत आणि जागा सहा. समीर तू कामोठे घे, मनोज तू कळंबोली, विकास तू करंजाडे, देवेश नवीनच आहेस त्यामुळे तू खांदा कॉलनी घे १५० च आहेत होऊन जातील. आणि सनी आता शेवटचा तू. १००० पनवेलचे आणि ५०० नवीन पनवेल ह्या दोन्ही जबाबदाऱ्या मी तुझ्यावर सोपवतो. तू इथला सगळ्यात जुना मुलगा आहेस आणि अनुभवी सुद्धा आहे त्यामुळे हि जबाबदारी तूच व्यवस्थितपणे पार पाडू शकशील अशी मला खात्री आहे. आपल्याकडे २ दिवस आहेत आणि काम भरपूर पडलेलं आहे. सर्वांनी एकदा सगळे पत्ते नजरेखाली घालून त्यानुसार द्रोपंपींग सुरु करा. आणि सनी ह्या सर्वांना कुठे काय अडलं तर मदत कर. काही लागलाच तर मी आहेच." असा सांगून प्रत्येकाला आपापली कामं वाटून देऊन चितळे सरांनी सगळी व्यवस्था केली आणि ते आपल्या केबिन मध्ये गेले. त्यांनी सगळी व्यवस्था केली खरी पण आपण दिलेलं कामं व्यवस्थित पार पडेल कि नाही ह्या विचाराने ते अस्वस्थ होते. त्यांची ती चलबिचल मनस्थिती पाहून सनी त्यांच्याजवळ गेला आणि, "सर, तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. तुम्हीच असे तोंड पाडून बसलात तर आम्ही कोणाकडून प्रेरणा घ्यायची? सर दरवर्षीच आपली मार्चची अशी घाई गडबड असते. तरी सुद्धा आपण सगळं करतो ना हॅन्डल? मग ह्या वेळी सुद्धा होऊन जाईल. फक्त तुम्ही खचून जाऊ नका. तुम्हीच जर असे ढसाळलात तर ह्या नवीन मुलांना आधार कोण देणार" असे म्हणून सरांना तो समजवू लागला. "पण तेच तर मोठं आव्हान आहे ना सनी. दरवर्षी आपली संपूर्ण टीम रेडी असते. पण ह्या वेळी सगळे नवीन मुलं आलेली आहेत. हाय देवेशला तर नुकतेच १२ दिवस झाले आहेत येऊन. अश्यावेळी कसं कामं फत्ते होऊ शकेल आपलं?" फारच नैराश्याने सरांनी सनीला विचारलं. "सर तुम्ही बाकीच्या कामाकडे लक्ष द्या. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला काहीही घाबरण्याचे कारण नाही. ड्रॉपिंग सगळी जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवा." असं म्हणत सनीने चितळे सरांना धीर दिला. सनी अनाथ होता. सनीचे आई आणि बाबा एकाच ऑफिस मध्ये कामं करत होते. एक दिवस मीटिंग साठी ते दोघे कारने ऑफिसला जाण्यास निघाले. आधीच मीटिंगला उशीर झालेला असल्याने सनीचे बाबा भरभर रास्ता न बघतच गाडी वेगाने चालवत होते. तितक्यात ८०च्या स्पीडला गाडी असतांना अचानक समोरून एक मोठं ट्रक आला. आणि गाडी कंट्रोल न झाल्याने जोरात ट्रक वर आदळली आणि त्या कारचा असिसिडेन्ट झाला. कार असिसिडेन्टमध्ये सनीची आई आणि सनीचे बाबा दोघे देखील स्वर्गवासी झाले. तेंव्हा सनी १० वर्षांचा होता. आई बाबा नसल्याने लहानपणापासूनच सनी अनाथ आश्रमात वाढत होता. कंपनीमध्ये सर्वात चपळ, हुशार आणि चितळे सरांचा आर्धा भार सांभाळणारा एकमेव मुलगा म्हणून सनीची ओळख होती. सनीच्या चपळता आणि हुशारीमुळे त्याचं नाव संपूर्ण कंपनी मध्ये सर्वांना माहीत होतं. त्याच्या ह्या कौशल्यामुळे लवकरच सनीचं प्रमोशन होणार होतं.
ठरल्याप्रमाणे सनीने सगळ्या मुलांना एकत्र जमवले. आणि आपल्याला वाटून दिलेल्या कामाची टप्प्या टप्प्यात विभागणी करून त्यानुसार सर्वांना त्याची योजना आखून दिली. आणि आपण स्वतः देखील आपल्या कामास लागला. दोन दिवसाचे १५०० पार्सल्सचे कामं सनीसाठी एका दिवसाचे होते. सनीने सगळे पार्सल्स बाहेर काढले. आणि एकदा सगळ्या पत्त्यांवर त्याने नजर फिरवली. त्यानंतर सर्वात दूरचे पत्ते पहिले गाठून नंतर येत येत आसपासचे पत्ते गाठायचे ह्या त्याच्या नेहमीच्या योजनेने तो जाण्यास निघाला. त्याने आपली बाईक जी बाहेर काढली ती थेट नवीन पनवेलच्या सेक्टर ४४ ला नेऊन थांबवली. नेहमीप्रमाणे सनीने पत्ता बघून आपली गाडी पार्क करून त्याने आजूबाजूच्या सर्व बिल्डींग्समध्ये ड्रॉपिंग करायला सुरवात केली. असं करत करत सनीने सगळं नवीन पनवेल दुपारपर्यंत कव्हर केलं. दुपारपर्यंतच आपलं २५% काम झालं म्हणून सनी थोडा रिलॅक्स झाला. त्यानंतर तो पनवेलला आला आणि एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला बसला. जेवून झाल्यावर परत त्याने आपली बॅग बाहेर काढून एकदा पार्सल्स वरील पत्त्यांवर नजर टाकली. त्यानंतर पत्त्यांचा आढावा घेऊन परत त्याने पनवेलमध्ये ड्रॉपिंग करायला सुरवात केली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सनीची जवळ जवळ ७०० पार्सल्स ड्रॉप करून झाली होती. आणि त्यामुळे आता तो एकदम रिलॅक्स झाला होता. आता ऑफिसच्या आजूबाजूचे पत्ते घेऊन तो त्यांचा परामर्श घेऊन आपल्या कामास निघाला. त्याने आता बिल्डींग्स सगळे कव्हर करून घेतले होते. आता काही बंगल्यांवर फक्त पार्सल्स ड्रॉप करायचे बाकी होते. गाडी बाजूला लावून तो बंगल्यांच्या दिशेने वळला. चालत चालत असताना अचानक त्याची नजर तिथल्या चिंतामणी नावाच्या एका बंगल्याच्या बाल्कनी कडे वळली. तिथे एक सुंदर तरुणी आपले ओले केस मोकळे सोडून पुसत असतांना सनीच्या दृष्टीस पडली. तिच्याकडे पाहून सनी क्षणभरासाठी तिच्या धुंदीत हरवून गेला. त्यानंतर त्याने त्या बंगल्याचे नाव वाचले. "अरे चिंतामणी बांगला. ह्याचं तर पार्सल आहे आपल्याकडे." असं म्हणून त्याने त्या बंगल्यात प्रवेश केला आणि बेल वाजवली. आपण वरती बघितलेल्या त्या मुलीचा चेहरा परत बघण्यासाठी सनी फार उत्सुक झाला होता. सनी त्याच विचारात मग्न होता तितक्यात त्या मुलीने दरवाजा उघडला. तिचे ते काळेभोर केस, डोळे आणि तो गोरापान देखणा चेहरा पाहून सनी तिच्या त्या सौंदर्यात पूर्णपणे हरवून गेला. तितक्यात "ओह्ह हॅलो, नुसते उभे काय आहात? काय काम आहे ते बोला." म्हणून त्या मुलीने सनीला विचारलं. तेंव्हा झोपेतून खडबडून जागा झाल्याप्रमाणे तिच्या सौंदर्यात हरवलेला सनी लगेच भानावर आला. "मॅडम तुमची डिलिव्हरी" असं म्हणत सनीने कुरिअर बाहेर काढत सहीसाठी आपली ड्रॉपिंग शीट पुढे केली. ते पाहून,"अहो पण हे नाव माझं नाही आहे. हा ऍड्रेस आमच्या समोरच्या बंगल्याचा आहे. 'श्री चिंतामणी' म्हणून. हा फक्त चिंतामणी आहे. हे बघा आमचं नाव वेगळं आहे" असं घरावरील सहस्रबुद्धे म्हणून लिहलेली नेमप्लेट कडे बोट दाखवत त्या तरुणीने सनीला सांगितलं. "ओके ओके..थँक यु." असं म्हणत सनीने बाहेर काढलेलं कुरिअर परत आपल्या बॅग मध्ये बहरून तो तिथून निघून गेला. सनी जरी तेथून निघून गेला असला तरी त्या तरुणीचा विचार मात्र त्याच्या मनातून काही गेला नव्हता. लव्ह ऐट फर्स्ट साईट सारखंच अगदी पहिल्याच नजरेत सनी त्या तरुणीच्या प्रेमात पडला. तिच्याच विचारात सगळे पुढे पत्ते शोधत शोधत त्याने सर्व पार्सल्स ड्रॉप करून टाकले. सगळे पार्सल्स ड्रॉप करून झाले असल्याने त्या दिवशी तो परत ऑफिस मध्ये न जाता तसाच अनाथ आश्रमात गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सनी ऑफिसला जाण्याची तयारी करू लागला. सनी सकाळपासून त्या मुलीच्याच विचारात असल्याने नेहमीपेक्षा आज मात्र त्याच्या चेहऱ्यावर विशेष टवटवी दिसून येत होती. त्याच्या त्या चेहऱ्यावरील ताजेपणा पाहून आश्रमातील सगळी मुलं त्याचं निरीक्षण करत होती आणि आपापसात "कुछ तो गडबड है आज सनी दादा इतका खुश आहे. कोणाच्या विचारात हरवलाय नक्की?" म्हणून कुजबुजत होती. सनी ऑफिस ला जायला निघणार तितक्यात "सनी दादा काय मग नवीन वाहिनी बघितलिस वाटतं आमच्यासाठी" असं म्हणून आश्रमातील मुलं सनीला चिडवू लागले. सनीने हळूच बाजूची काठी हातात घेतली आणि मुलांना दाखवली तोच सर्व मुलं तिथून पळून गेली. नंतर सनी गाडी घेऊन ऑफिस ला जाण्यास निघाला. सनी ऑफिस मध्ये पोहोचला तरी तो तिच्याच विचारात मग्न झालेला होता. चितळे सरांनी त्याला आल्या आल्या कालच्या ड्रॉपिंगचा स्टेटस विचारला. मात्र सनी तिच्याच विचारात हरवलेला असल्याने त्याला सर काय म्हणत आहेत ते काहीच ध्यानात येत नव्हते. सरांनी परत सनी म्हणून एक हाक मारली. तेव्हा सनी भानावर आला. "हा कालचं ना? झाले सगळे काल." सनीच्या तोंडचे ते शब्द ऐकताच आपण ज्या विश्वासाने सनीकडे जबाबदारी सोपवली होती ती त्याने पूर्णपणे एका दिवसातच पार पाडली हे पाहून चितळे सरांना फार आनंद झाला. त्या आनंदाच्या भारत चितळे सरांनी एक शाबासकी दिली आणि त्या दिवशी सनीला सुट्टी दिली. बंगल्यावरच्या त्या मुलीचं पुन्हा एकदा कधी आपणास दर्शन होईल ह्या विचाराने सनीचे डोकं चक्रावून गेलं होत. त्यात सरांनी दिलेल्या सुट्टीमुळे सनीला आता तिला बघायला जाण्याची चांगली संधी उपलब्ध झाली होती. सनीने चटकन उठून सरांचे आभार मानले आणि ऑफिस मधून निघून तो थेट तिच्या बंगल्याजवळ जाऊन पोहोचला. ती मुलगी तिथेच कालसारखी बालकनीमध्ये उभी होती. तिला बघताच सनीचं हृदय एकदम प्रफुल्लित झालं. सनी तसाच तिच्या चेहऱ्याकडे बघत आपल्या बाईक वर बसला होता. थोड्या वेळाने त्या मुलीचं देखील लक्ष सनी कडे गेलं. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती तशीच आत निघून गेली. त्यानंतर रोज सनी ने तिच्या बिल्डिंग खाली जावे आणि तिने सनीला बघून त्याकडे दुर्लक्ष करावे असा दैनंदिन कार्यक्रम चालू झाला. एक दिवस सनी काही काम नसल्याने ऑफिस मध्ये विचार करत बसला होता. तेव्हा जवळ जवळ आठवडा झाला आपण फक्त त्या मुलीला तिच्या बंगल्याखाली उभे राहून बघतच आहोत आता बघून काय फायदा नाही तिच्याशी संपर्क करायला हावा असा विचार सहज सनीच्या मनात येऊन गेला. लगेच सनीला एक युक्ती सुचली. त्याला तिचं आडनाव आणि तिच्या घरचा पत्ता तर माहीतच होता. सनीने लगेच समोरील टेबलावरून एक लिफाफा उचलला आणि त्यावर तिचा पत्ता चिंतामणी बांगला आणि तिचं आडनाव सहस्रबुद्धे ह्या दोन्ही गोष्टी त्या लिफाफ्यावर नमूद केल्या. आणि नंतर एक कागद घेऊन त्यावर आपल्या तिच्याविषयीच्या प्रेममय भावना त्याने त्या कागदात उतरवून काढल्या. नंतर तो कागद त्या लिफाफ्यात भरून तो लिफाफा तिला देण्यासाठी तो निघाला. आत्तापर्यंत तिच्या विचाराने प्रेमाने प्रफुल्लित होणारे काळीज आत्ता मात्र भीतीने धडधडत होते.आपण दिलेलं पात्र वाचून जर तिला नाही आवडलं तर? जर तिने माझा हा आगाऊपणा बघून डायरेक्ट कंपनीकडे तक्रार केली तर? आपण तर फक्त एक डिलिव्हरी बॉय आहोत आणि ती तर इतक्या मोठ्या बंगल्यात राहणारी एक मुलगी आहे तेंव्हा आपली आणि तिची बरोबरी होऊ शकते का? अश्या असंख्य प्रश्नांनी त्याच्या मनाला वेढा घातला होता. विचार करत करत तो तिच्या दरवाज्यापर्यंत पोहोचला. आता बेल वाजवू कि नको हे त्याला काळात नव्हते. शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपले मन घट्ट करून त्याने तिच्या दाराची बेल वाजवली. बेल वाजवल्यावर थोड्या वेळाने तिने येऊन दरवाजा उघडला. तिला बघताक्षणी सनीच काळीज अजूनच धडधडू लागलं. तिने दार उघडलं. आणि त्याच्या हातातील लिफाफा बघितला. यावर नाव तर सहस्रबुद्धेच आहे पण आपल्याला कोणता लिफाफा आलाय ह्या विचाराने ती आश्चर्यचकित झाली आणि तिने सनीच्या हातातील लिफाफा आपल्या हातात घेतला. तितक्यात सनीने "मॅडम...नंबर आणि सही" असं म्हणत त्याची ड्रॉपिंग ची शीट बाहेर काढली. त्या मुलीने स्मितहास्य करून सनीकडे बघत "आत या" असे म्हणून सनीला आत बोलावले आणि पिण्यास पाणी दिले. सनीचे पाणी पिऊन झाल्यावरतीने ग्लास त्याच्या हातातून घेतला आणि त्याने दिलेल्या शीट वर सही आणि नंबर टाकून ती शीट त्याच्या स्वाधीन केली. नंतर ती शीट घेऊन "थँक यु मॅडम" असं म्हणून सनी तेथून बाहेर आला. बाहेर येऊन परत ऑफिस मध्ये जाते वेळी "किती चांगली मुलगी आहे. इतक्या मोठ्या घरात राहत असूनही माझ्यासारख्या कुरिअर बॉयला आत बोलवून पिण्यास पाणी दिल. खरंच हि माझी प्रियासी झाली तर आमची जोडी किती छान दिसेल. पण तिला माझं लव्ह लेटर आवडेल का? तिला नाही आवडलं तर काय करायचं?" असे अनेक विचार त्याच्या मनात येत होते. परंतु तो खुश होता कारण २ शब्द का होईना त्याचं तिच्याशी बोलणं झालं होतं. आणि दुसरं म्हणजे तिने केलेल्या सहीवरून 'मोनाली सहस्रबुद्धे' हे तिचं संपूर्ण नाव देखील त्याच्या लक्षात आलं होतं.
इकडे मोनालीने सनीने दिलेला लिफाफा खोलून बघितला. तर त्यात एक पत्र लिहलेलं मोनालीला आढळलं. मोनालीने ते पत्र बाहेर काढलं. त्यामध्ये "प्रिय सहस्रबुद्धे मॅडम, मी दुसरं तिसरं कोणी नसून तोच डिलिव्हरी बॉय आहे जो रोज तुमच्या बंगल्याखाली उभा असतो. ज्याने आज तुम्हाला हा लिफाफा ड्रॉप केला. मला नाही माहित मी हे जे पत्र तुम्हाला लिहीत आहे ते कितपत योग्य आहे. पण मला खूप दिवसांपासून माझ्या मनातील तुमच्याविषयीच्या भावना तुमच्यासमोर व्यक्त करायच्या आहेत. पण त्या कश्या कराव्यात हेच नेमकं काळात नव्हतं. मग शेवटी नाईलाजाने मला हा पर्याय निवडायला लागला. तुम्हाला आठवतं का आठवड्यापूर्वी माझ्याकडून चुकून तुमच्या घरी एक रॉंग डिलिव्हरी होणार होती. तेंव्हा प्रथमच मी तुम्हाला पाहिलं आणि ते लव्ह ऐट फर्स्ट साईट म्हणतात ना अगदी तसंच मला झालं होतं. तेंव्हापासून रोज मी खास तुमचा चेहरा पाहण्यासाठी इथे तुमच्या बंगल्याखाली बाईक घेऊन उभा असायचो. मला आजपर्यंत कोणत्याच मुलीवर इतकं प्रेम नाही आलं. तुम्ही पहिल्याच आहेत ज्यांना पाहून माझं मन रोज प्रफुल्लित होऊन जातं. माझं खरंच तुमच्यावर फार मनापासून प्रेम आहे." मोनाली संपूर्ण पत्रं वाचते आणि आश्चर्यचकित होते. एका डिलिव्हरी बॉयचं प्रेमपत्र प्रथमच तिला आलेलं होतं. त्यानंतर एक स्मितहास्य करून तिने ते पत्र समोरील टेबलवर ठेवून दिली. आणि ती आत आपल्या बाबांकडे जाण्यास निघाली. तितक्यात तिची नजर पुन्हा एकदा त्या टेबलवर ठेवलेल्या पत्राकडे गेली. तिने ते पत्रं उचलून पाहिलं. त्या पत्रावर मागे "मॅडम पुन्हा एकदा सॉरी मी काही तरी मागत आहे तुमच्याकडे. मला तुमच्याशी मैत्री करायची तरी परवानगी मिळू शकते का?" मोनालीला ते वाचून हसू आवरेनासं झालं.सनीच्या साधेपणाचं आणि प्रामाणिकपणाचं मोनालीला कौतुक वाटलं. मोनालीची आई लहानपणीच स्वर्गवासी झाले होते आणि मनालीच्या बाबांना पॅरालीसीस अटॅक येऊन त्यांचे एका बाजूचे हात आणि पाय दोन्ही निकामी झाले होते. त्यामुळे ते सतत एका रूम मध्ये झोपलेले असत. एवढ्या मोठ्या बंगल्यात मोनाली आणि तिचे बाबा दोघंच राहत असत. मोनाली स्वतः एक सीए असून तिचं त्या बंगल्यातच एक ऑफिस होतं.
इकडे मोनालीने आपलं पत्र वाचलं असेल कि नाही ह्या विचाराने सनीचे मन चक्रावून गेले होते. तो ऑफिस मधून परत घरी जाईपर्यंत मोनालीने आपलं पत्र वाचलं असेल कि नाही ह्याच विचारात होता. शेवटी न राहावल्याने रात्री त्याने तिला "मॅडम मी सनी. तुम्हाला सकाळी पत्र दिलं होतं ना. वाचलंत का ते तुम्ही?" मॅसेज केला. मोनालीने मेसेज वाचला आणि एका कॉफी शॉपचा पत्ता पाठवला आणि त्यासोबत वेळ सुद्धा पाठवली. सनी हुशार होता. पत्ता आणि वेळ पाहून आपणास भेटायला मोनालीने बोलावले आहे हे त्याने ताडले. दुसऱ्या दिवशी ठरलेली वेळ आणि ठरलेल्या ठिकाणी बरोबर सनी येऊन पोहोचला. मोनाली सनीची थोडी परीक्षा पाहावी या दृष्टीने कॉफी शॉप समोर आपली गाडी पार्क करून गाडीतूनच सनीचं सूक्ष्म निरीक्षण करू लागली. इथे सनी बिचारा संध्याकाळी ५ वाजता जो आला होता तो रात्रीचे ९ वाजले तरी
तिथेच मोनालीची वाट पाहत उभा होता. शेवटी मोनालीला त्याच्या त्या भोळेपणाचा दया आली आणि तिने त्याला कार मधूनच "सॉरी आज नाही जमणार मला भेटायला" म्हणून मेसेज केला. तो मेसेज पाहून सनी निराश झाला आणि तेथून निघून गेला. तो निघालेला पाहून मोनालीने देखील आपली गाडी घराकडे नेली. रस्त्यातून जाता जाता मोनालीला सनीच्या त्या प्रामाणिकपणाचे कौतुक वाटले. तसेच सनी खरोखरच प्रामाणिक असल्याची तिला खात्री पटली. आत्तापर्यंत सनी रोज मोनालीचा विचार करत करत झोपत होता. पण त्या दिवशी मोनाली आणि सनी दोघे देखील एकमेकांचा विचार करत करत झोपी गेले.
दुसऱ्यादिवशी सकाळी उठल्यावर मोनाली नेहमीप्रमाणे आपली तयारी सुरु केली. ती ब्रश करायला बाथरूम मध्ये गेली. दात घासता घासता सनीचाच विचार तिच्या मनात घोळत होता. आता मोनालीला देखील सनीचा चेहरा बघितल्याशिवाय करमत नव्हते. सनीचा तो प्रामाणिकपणा आणि ते प्रेम पाहून मोनालीला देखील सनीला एकदा भेटून बघावसं वाटत होतं. लगेच मोनालीने आपला फोन घेऊन सनीला परत त्याच कॉफी शॉपचा पत्ता आणि तीच वेळ पाठवली. इकडे सनी सकाळी उठल्यापासून तोंड पाडूनच होता. काल संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आपण शॉप वर आलो तर होतो पण मोनाली मात्र तिथे आलेली नव्हती. म्हणून त्याचा चेहरा जो पडला होता तो सूर्य दिवशी सकाळी देखील तसाच होता. त्याच पडलेल्या तोंडाने त्याने सकाळची आपलीं कामं आटपून घेतली आणि ऑफिस ला जाताना त्याने आपला फोन हातात घेतला. तेंव्हा मोनालीचा मेसेज त्याच्या दृष्टीस पडला. तीच वेळ आणि तोच पत्ता पाहून खरंच हा मेसेज मोनाली पाठवत आहे कि कोणी आपल्यासोबत मस्करी करत आहे हे विकीला कळत नव्हते. त्यात सनीची आज ४ वाजता एक महत्त्वाची मीटिंग होणार होती. शिवाय मीटिंग संपणार कधी ह्याची देखील सनीला कल्पना नव्हती. तरी आज तरी मोनाली आपल्याला भेटेल ही अपेक्षा मनात धरून सनी ऑफिसला गेला. ठरल्याप्रमाणे ४ वाजता मीटिंग सुरु झाली. लवकरात लवकर मीटिंग संपूदेत आणि आपल्याला ५ वाजता मोनालीला भेटायला जायला मिळूदेत म्हणून सनी देवाकडे प्रार्थना करू लागला. देवाने त्याची प्रार्थना पूर्ण केली कि काय कोण जाणे पण सुदैवाने सनीच्या इच्छेनुसार ४ वाजता सुरु झालेली मीटिंग बरोबर ५ वाजता संपली. मीटिंग संपल्या संपल्या क्षणाचाही विलम्ब न लावता सनी ऑफिसमधून निघून निघाला. त्याने आपली बाईक जी काढली ती थेट त्याने कॉफी शॉपवर नेऊन थांबवली. त्याने आपली बाईक पार्क केली आणि तो कॉफी शॉप मध्ये गेला. तेंव्हा मोनाली त्याची वाट बघत टेबल वर बसलेली त्याला आढळली. लगेच तोच टेबलवर गेला आणि मोनालीला उद्देशून,"सॉरी मॅडम उशीर झाला...ऍक्चुअली एक महत्वाची मीटिंग होती त्यामुळे".."अरे बस बस बस...कळलं मला. ठीक आहे मी पण आत्ताच आले २ मिनिटांपूर्वी." सनीचे बोलणे थांबवत थांबवत मोनाली म्हणाली. दोघे २ मिनिटे एकमेकांकडे फक्त बघतच बसले होते. तितक्यात भानावर येऊन सनीने "मॅडम तुम्ही काय घेणार?" म्हणून मोनालीला विचारले. तेंव्हा मोनाली "वेड्या, नाव आहे मला. मोनाली नाव आहे माझं. मॅडम मॅडम नको बोलू. नंतर जर आपण रिलेशनशिप मध्ये आल्यावर पण असंच मॅडम मॅडम हाक मारणार का?" असं हसत हसत सनीला म्हणाली. मोनालीचे ते शब्द ऐकून सनी लाजला आणि मान खाली घालून गालातल्या गालात हसायला लागला. ते पाहून मोनालीला आणखीनच हसू आवरेनासं झालं.ती सनीला उद्देशून,"अरे वाह! मुलं देखील लाजतात. मला आजच कळलं" असं म्हणून त्याची थट्टा उडवू लागली. सनी जरी हुशार असला तरी प्रेमाच्या बाबतीत तो फारच कच्चा होता. त्यामुळे त्याला कोणत्या वेळी नक्की कसा प्रतिसाद द्यावा ह्याची तिळमात्रही कल्पना नव्हती. तरीदेखील दोघांमध्ये खूप वेळ गप्पा गोष्टी रंगल्या. ५ वाजता जे दोघे बसले होते ते रात्री १० वाजले तरी त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या. रात्री १० वाजता कॉफी शॉपचा मालक जेंव्हा शॉप बंद होण्याची नोटीस द्यायला आला तेंव्हा दोघे भानावर आले. मोनाली १० वाजले बाबा घरी आपली वाट बघत असतील म्हणून लगेच तिथून जाण्यास निघाली. सनीसुद्धा आश्रमात सगळेजण आपली वाट बघत असतील म्हणून लगेच उठून घरी जाण्यास निघाला. शेवटी दोघांनीही एकमेकांना प्रेमालिंगन देऊन निरोप दिला आणि दोघे घरी जाण्यास निघाले.
हळू हळू मोनाली आणि सनी दोघांचेही परस्परांमधील प्रेम वाढत गेले. दोघांनीही रोज सकाळी लवकर उठावे, एकमेकांशी फोनवर दिवसभर खूप साऱ्या गप्पा माराव्यात, एकमेकांशी सर्व क्षण शेअर करावेत, कधीकधी मधूनच एकमेकांशी भांडावे, आणि नंतर एकमेकांची रुसलेली मने गोड गोड बोलून परत प्रसन्न करावीत. असा त्यांचा दैनंदिन दिनक्रम असायचा. बरेच दिवस मोनाली आणि सनी एकमेकांना भेटले नव्हते. एक दिवस दोघांनीही भेटायचं ठरवलं. पावसाचे दिवस होते. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरण अगदी प्रेममय होऊन गेलं होतं. दोघांनाही एकमेकांना कधी भेटू असं झालं होतं. त्या दिवशी संध्याकाळी दोघे जण आपापली कामं उरकून नेहमीच्या कॉफी शॉपवर गेले. दोघांमध्ये फार वेळ गप्पा गोष्टी रमल्या. बाहेर पडत असणाऱ्या रिमझिम पावसाच्या धारांमुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात वाहून जात होते. त्यादिवशी वातावरण इतकं रोमँटिक होतं कि रात्रीचे १० वाजले, शॉपकिपर शॉप बंद करण्याची नोटीस घेऊन आला तरीसुद्धा दोघांना एकमेकांना सोडून जावंसं वाटत नव्हतं. दोघांचेही आपापसातील प्रेमसंबंध वाढत होते. शॉप बंद होतं असल्याने मोनाली सनीला आपल्या घरी घेऊन गेली. घरी गेल्यावर त्या सुंदर वातावरणात मोनाली आणि सनी दोघेही वाईनचा आस्वाद घेत घेत गप्पागोष्टी करत होते. उभयतांमधील गप्पागोष्टी फार वेळ रंगल्या. नंतर आपल्याला आता निघायला हवे असा विचार सनीच्या मनात आला. पण त्याला त्या प्रेममय वातावरणात तेथून निघून जाण्याची इच्छा होतं नव्हती. मोनालीने अलगद सनीच्या हातातील वाईनचा ग्लास आपल्या हातात घेतला आणि बाजूच्या टेबलवर ठेवून दिला. त्यानंतर सनीच्या हाताला धरून ती त्याला आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेली. त्यानंतर बेडरूमच्या दरवाज्याला काडी लावून मोनाली सनीच्या जवळ गेली. आणि अलगद त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत ती एक एक करून सनीच्या शर्टची बटणं काढू लागली. त्यानंतर सनीचा शर्ट काढून तिने अलगद सनीला धक्का देऊन त्याला पाठीमागच्या पलंगावर पाडले. त्यानंतर ती आपण स्वतः त्याच्या अंगावर चढली. दोघांमधील प्रेमाचे आता वासनेमध्ये रूपांतरण होतं होते. मोनालीने सनीच्या अंगावर चढून बाजूच्या टेबलवर असलेल्या तिच्या आईचा फोटो आडवा पाडला. थोड्यावेळाने मोनालीने आडवा पाडलेला आईचा फोटो परत उचलून होता तसा टेबलवर ठेवून ती पलंगावरून उठली. तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. तिचं शरीर संपूर्ण रक्ताने भरलेलं होतं. तिने पलंगावर आडवा असलेल्या सनीवर एक नजर टाकली. सनीच्या गळा खोलवर काप बसलेला असून पलंगावर सर्वत्र रक्त पसरलेलं होतं. तिने आपल्या हाताची दोन बोटे सनीच्या नाकाजवळ नेऊन सनीचा श्वासोच्छवास तपासून पहिला. श्वास पूर्णपणे थांबलेला असल्याची खात्री झाल्यावर मोनालीने सनीचे पाय धरून सनीचं पार्थिव खेचत खेचत बेडरूम मधून बाहेर काढून खाली घराच्या बेसमेंट नेले. बेसमेन्टमध्ये सनीसारखेच अजूनही ५-६ जणांचे पार्थिव पडलेले होते. तसेच समोरच्या भिंतीवर मोनालीच्या आईचा एक मोठा फोटो लावलेला होता. सनीचे पार्थिव खेचत खेचत तीने ते आईच्या फोटो जवळ नेऊन टाकले आणि "आई हा घे तुझ्या आणखी एका गुन्हेगाराचा बळी" असं मोठ्याने ओरडून ती ओक्शाबोक्शी रडू लागली. मोनालीला आता तिचा संपूर्ण भूतकाळ तिच्यासमोर दिसत होता. पनवेलचे आमदार डॉ. प्रकाश सहस्रबुद्धे आणि त्यांची पत्नी सौ. स्मिता सहस्रबुद्धे ह्यांची एकुलती एक मुलगी म्हणजे मोनाली सहस्रबुद्धे. एकुलती एक मुलगी असल्याने डॉ. प्रकाश सहस्रबुद्धे आणि त्यांच्या पत्नी सौ. स्मिता सहस्रबुद्धे दोघांनाही मोनाली फार लाडकी होती. तिघंही आनंदाने घरी नांदत असत. एक दिवस मोनाली शाळेतून नुकतीच घरी आली होती. तितक्यात एक डिलिव्हरी बॉय एक कुरिअर घेऊन त्यांच्या घरी आला. मोनालीचे वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. स्मिता ताईंच्या नेहमीच्या स्वभावानुसार त्यांनी त्या डिलिव्हरी बॉयला आत बोलावून पिण्यास पाणी दिले. मात्र त्या डिलिव्हरी बॉय ची मति भ्रष्ट झालेली असल्याने त्याने त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत स्मिता ताईंवर बलात्कार केला. मोनाली आत अभ्यास करत बसली होती. आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून लगेच मोनाली बाहेर आली आणि ती त्या डिलिव्हरी बॉयला अडवू लागली. तितक्यात त्या डिलिव्हरी बॉयने मोनालीला भिरकावून लावले आणि समोरील कपाटावर डोकं आपटून मोनाली बेशुद्ध झाली. त्यानंतर स्मिता ताईंवर बलात्कार करून डिलिव्हरी बॉय तेथून निघून गेला. नेहमी सर्वांसाठी झटणाऱ्या स्मिता ताईंवर आज इतका भयंकर प्रसंग ओढवला होता तरी कोणीच त्यांच्या मदतीला तिथे आलं नव्हतं. थोड्यावेळाने मोनाली शुद्धीवर आली. लगेच उठून ती पहिले आईला शोधायला घरभर आई आई म्हणून हाका मारत फिरत होती. नंतर घराच्या बेसमेंटमध्ये तिने प्रवेश केला. तोच पंख्यावर फास लावून आईने आत्महत्या केलेलं तिच्या दृष्टीस पडलं. जेंव्हा ही बातमी मोनालीच्या बाबांना समजली तेंव्हा त्यांची मनस्थिती बिघडून त्यांना पॅरालीसीसचा अटॅक आला. आईवर झालेले ते अत्याचार आणि त्यामुळे बाबांना झालेला त्रास पाहून मोनालीला राग सहन न झाल्याने तिच्या त्या रागामुळे मोनालीचे रूपांतरण एका सिरीयल किलर मध्ये झाले होते. तेंव्हापासून आपल्या आईवर झालेल्या अत्याचाराचा आणि त्यामुळे वडिलांना झालेल्या त्रासाचा सूड घेण्यासाठी मोनाली तिला आढळणाऱ्या प्रत्येक डिलिव्हरी बॉयचा बळी घेऊन ज्या ठिकाणी आपल्या आईने आत्महत्या केली त्याच ठिकाणी नेऊन आपल्या आईच्या फोटोसमोर तो बळी अर्पण करत असे. मोनालीच्या त्या सुंदर चेहऱ्यामागील त्या क्रूर सिरीयल किलरच्या हातून निष्पाप सनीच्या रॉंग डेलिव्हरीमुळे त्याचा शेवट झाला.

Comments
Post a Comment