वागणूक !!!
(ट्रिंग ट्रिंग ट्रिंग...ट्रिंग ट्रिंग ट्रिंग...!! निखिलचा अलार्म वाजला. लगेच निखिल उठला आणि त्याने एक झलक घड्याळाकडे टाकली.)
निखिल: "ओह शिट! ७.३० वाजले."
(लगेच निखिल उठला आणि ब्रश करून अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला. भरभर आंघोळ उरकून निखिल बाहेर आला. बाहेर आल्या आल्या कपडे घालत घालत बायकोला उद्देशून,)
निखिल: "मीरा मला उशीर झालाय. आज मला नाश्ता नको मी जातो लगेच निघून."
(ते ऐकून मीरा किचनमधूनच निखिल ला आवाज देत,)
मीरा: "अरे असं काय करतोस. नाश्ता तयार आहे. लगेच खाऊन जा ना. दोन मिनिट देखील लागणार नाहीत."
(आधीच उशीर झाल्याने निखिल वैतागलेला होता. त्यामुळे तयार होऊन लगेच तो बाहेर आला आणि मीराला उद्देशून,)
निखिल: "हि गोष्ट आहे ना मीरा तू सकाळी लक्षात घ्यायला हवी होतीस. स्वतः मात्र सकाळी मस्तपैकी लवकर उठून आपल्या कामाला लागलीस आणि मला इथे उठवायला तुला जमलं नाही"
(निखिलचे ते टोचून बोललेले शब्द कानावर पडताच "आपली काय चूक नसताना उगाच ऐकायला लागतंय " म्हणून मीरा देखील वैतागली. त्यामुळे त्या वैतागलेल्या मूडमध्ये निखिलला उद्देशून,)
मीरा: "कारण नसताना का चिडतोयस तू माझ्यावर? मी सकाळी उठून माझी कामं करायला घ्यायची कि तू वेळेवर उठलास कि नाही ते बघायचं?"
(निखिल आपल्या बुटांची लेस बांधत होता. मीराच्या तोंडचे ते शब्द ऐकून निखिल अजूनच वैतागला. रागारागात मीराला उद्देशून,)
निखिल: "हे बघ मीरा ह्या फालतू गोष्टींवर भांडायला तू रिकामटेकडी असशील पण मला अजिबात वेळ नाहीये हा. मला आधीच उशीर झालाय. चावी दे लवकर. मी कार घेऊन चाललोय ऑफिसला."
मीरा: "आज दामू आजारी आहे. त्यामुळे आज कार धुतलेली नाहीये."
(मिराच्या तोंडचे ते शब्द ऐकताच "आज ह्यांना ह्यांची लायकी दाखवतो." असं म्हणून निखिलने समोरील टेबलवर ठेवलेला डबा आपल्या बॅग मध्ये भरला आणि घाई घाईत तो खाली उतरला.
खाली उतरल्यावर निखिल समोरच असलेल्या छोट्या पडीक अश्या अवस्थेत असलेल्या दामूच्या घरात गेला. दामू आजारी असल्याने घरी विश्रांती घेत झोपलेला होता. त्याला त्या अवस्थेत बघून निखिलने मोठ्याने दामू म्हणून हाक मारली. लगेच दामू बाहेर आला. दामूला बघून निखिलचा पार अधिकच चढला. त्याला उद्देशून रागाने,)
निखिल: "आज गाडी का नाही धुतलीस?"
(ते बघून मागून दामूची बायको आली आणि निखिलला उद्देशून,)
दामूची बायको: "भावजी, त्यांची तब्येत खराब हाय. कालपासून ताप आलाय. उतरतच नायये."
(दामूच्या बायकोचे ते उत्तर ऐकून निखिलने तिच्याकडे पाहिले आणि रागाच्या भारत तिला उद्देशून,)
निखिल: "तुला विचारलं का मी? वायफळ बडबड करू नकोस. तू तुझ्या कामाला लाग. मीरा वरती वाट बघतेय."
(ते ऐकून लगेच)
दामूची बायको: "व्हय भावजी. जाते."
(असं म्हणत मान खाली घालत तेथून निघून गेली.)
(निखिल परत दामूला उद्देशून,)
निखिल: "आज गाडी का धुतली गेली नाही?"
दामू: "दादा, खरंच ताप आलाय."
(ते ऐकून निखिल आणखीनच चवताळला आणि दामूवर ओरडून,)
निखिल: "रोज गाडी धुण्याचे तुला पैसे मिळतात तरी तू गाडी का धुतली नाहीस? कि फुकटचं खायला येतोस इथे? मालक आहे आपल्याला पैसे द्यायला आपण काय गाडी धुतली काय नाही धुतली काय. कोण्याच्या बापाला फरक पडतो. बरोबर ना? असंच आहे ना? जेव्हा बघावा तेव्हा कारणं, कारणं, आणि नुसती कारणं. हो त्याचेच पैसे देतो ना आम्ही तुम्हाला. पैसे मिळाले म्हणजे कारणं द्यायला आपण मोकळे. लगेच दादा ताप आलाय ना हे आलाय ना ते आलाय. कामचोर साले. आमच्या पैश्यांवर तुमचं पोट चालतं. भीक मागायची पाळी येईल तुला जर कामावरून काढलं तर. समझलं का? ह्यापुढे परत जर मला तुझा हा हलगर्जीपणा दिसला ना दामू, तर याद राख. ना तुला कामावर ठेवणार ना तुझ्या बायकोला. मग बसा नवरा बायको दोघे भीक मागत."
(इतकं बोलून निखिल तेथून निघून जातो आणि कॅब बुक करून तो ऑफिसला पोहोचतो. ऑफिसमध्ये गेल्यावर नेहमीप्रमाणे तो आपल्या डेस्कवर जाऊन आपली कामं करायला बसतो. कामं करत असता असता निखिलचा बॉस तिकडे येतो. आणि निखिलला उद्देशून,)
बॉस: "काय निखिल साहेब? आज काय बायको जास्त उत्साही होती वाटतं. नाही यायला उशीर झाला म्हणून विचारलं."
(ते ऐकून निखिलने खजील होऊन मान खाली घातली. आणि निखिल "सॉरी सर" म्हणाला. ते ऐकताच)
बॉस: (हसत हसत निखिलच्या पाठीवर हात मारत) "अरे गम्मत करतोय रे. चालतं कधी कधी उशीर झाला असा तरी. नायतर आमची बायको. बघूनच उत्साह सगळा पार पळून जाईल."
(नंतर पुन्हा निखिल ला उद्देशून,)
बॉस: "चल. कामाचं दाखव चल सगळं. झालं का व्यवस्थित सगळं?"
(निखिल लगेच सगळ्या फाईल टेबलावरून उचलून सरांना दाखवत दाखवत,)
निखिल: "हो सर सगळं झालाय. हे बघा ! हि राहुल भातणकरची केस. सगळी क्लिअर आहे. त्यानंतर कुलकर्णी केस सुद्धा क्लिअर. त्यांना टॅक्स लेटर फक्त पाठवायचं राहिलाय. ते काल कुरिअरवाल्यांचा संप होता म्हणून राहून गेलं. आणि.."
(तितक्यात निखिlचे वाक्य तोडत तोडत,)
बॉस: "हा बरं झालं टॅक्स लेटर वरून आठवलं. त्या फणसे सरांचं टॅक्स लेटर पाठवलं का? नायतर परत कीर्तन चालू करेल तो चू*."
(बॉसचे ते शब्द ऐकून,)
निखिल: "नाही सर सांगितलं ना कुरिअरवाल्यांचा संप होता काल."
निखिलच्या तोंडचे ते शब्द ऐकून बॉस भयंकर चिडला. आणि चिडून
बॉस: "व्हॉट नॉन्सेन्स...तुला काल पाठवायला सांगितलं होतं तू पाठवलं का नाहीस? आता कारणं देतोयस. लाज नाही वाटत कारणं देताना. कुरिअरवाला ना हे ना ते. एक कामं दिलेलं धड जमत नाही तुम्हाला. काय झक मारायला येता का ऑफिसला? कामात काही नावीन्य आणायचं ते तर नाहीच जी दिलेली काम आहेत ती पण नाही जमत तुम्हाला. तुम्हाला कामाला ठेवलाय कशाला हेच नाही कळात मला. शेवटचं सांगतोय निखिल तुला. जमत नसेल तर सोडून जा इथून. गरज नाही तुझी ह्या ऑफिसला. भिकार*ट साले. फुकटचा पगार हवा आहे तुम्हाला. लायकी आहे का तुमची?"
(चाललेला तमाशा इतका वाढला होता कि बघता बघता पिऊन सकट सगळा स्टाफ तो तमाशा बघायला जमला होता. निखिल तिथेच खाली मान घालून उभा होता. थोड्यावेळाने निखिलला बडबड करून बॉस तिथून निघून गेला. तितक्यात लंचटाइम बेल वाजली आणि सगळा जमाव नाहीसा झाला. निखिलचा मित्र तिथे आला आणि निखिल ला घेऊन,)
निखिलचा मित्र: "जाऊदे रे निखिल. नको जास्त विचार करुस. चल डबा खायला घेऊयात. बघू आज वाहिनीने काय दिलंय."
(मित्राचे ते शब्द ऐकून पडलेल्या तोंडानेच निखिलने डब्बा बाहेर काढला. डब्बा उघडताच निखिलला आपण सकाळी आपल्या बायकोला जे जे बडबडलो ते सगळं आठवू लागलं. चूक नसतांना आपण मीराला विनाकारण बडबड केली आणि ह्या गोष्टीचं निखिलला आता वाईट वाटत होतं. त्याच पडक्या तोंडाने डबा खात खात निखिल परत कामं करायला बसला.)
(ऑफिस सुटल्यावर निखिल घरी जाण्यास निघाला.नंतर टॅक्सी पकडून तो घरी जाऊ लागला. तेव्हा घरी जात असताना त्याला आपण विनाकारण आपण सकाळी दामूला बडबड केली ते सगळं त्याला आठवू लागलं.. दामूला ताप आलेला असूनही आपण दामूशी रागाच्या भरात इतक्या खालच्या दरात बोललो ह्याचा त्याला आता पश्चाताप होतं होता.)
(नंतर टॅक्सी घराखाली येऊन पोहोचल्यावर निखिल टॅक्सी मधून उतरला आणि टॅक्सी ड्रायव्हरला पैसे देऊन तो घरी जाण्यास निघाला. तेव्हा त्याची नजर खाली उभी असलेल्या त्याच्या गाडीकडे गेली. तेव्हा त्याची गाडी धुवून एक्दम चकाकत असल्याची त्याच्या दृष्टीस पडली. ते बघून आपण इतकी खालच्या दाराची वागणूक देऊनही दामूने आपली गाडी धुवून एकदम चकाचक केली ह्या विचाराने निखिलच्या डोळ्यांत पाणी आले. तो दामूच्या घरी गेला.
तितक्यात निखिल ला घरी आलेलं बघून,)
दामू: " दादा मी पाय पडतो तुमच्या. मला कामावरून काढू नका ना. बघा मी तुमची गाडी एकदम चकाचक करून ठेवलीये. प्लिज मला कामावरून काढू नका ना."
(असं म्हणून हात जोडून विनंती करू लागला.)
(दामूचे ते बोलणे ऐकून निखिलच्या डोळ्यांत पाणी आले. त्याने दामूचे ते जोडलेले हात पकडून निखिलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर आपले डोळे पुसून स्फुंदत स्फुंदत आपल्या खिशातून पैसे काढले आणि दामूच्या हातात ठेवून,)
निखिल: "हे घे. डॉक्टरकडे जाऊन ये. आणि तब्येतीची काळजी घे. जोपर्यंत तब्येत ठीक होतं नाही तोपर्यंत कामावर येऊ नकोस." इतकं बोलून निखिल तेथून निघून गेला.
नंतर घरी पोहोचल्यावर तो फ्रेश झाला आणि त्याने मीराला हाक मारली. तितक्यात मीराने त्याच्यासाठी जेवण आणलं आणि ती पुन्हा किचनमध्ये जाण्यास निघाली. मीराचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. ती आत जाणार तितक्यात निखिलने तिचा हात पकडला आणि तिला उद्देशून,
निखिल: "तू पण बस ना. तू का नाही बसत आहेस जेवायला?"
मीरा: "नाही. माझं पोट भरलंय."
निखिल: "सॉरी मीरा. मी विनाकारण सकाळी तुझ्यावर चिडलो."
मीरा: "हात सोड निखिल. मला अजून भरपूर कामं आहेत."
(असं म्हणत निखिलचा हात झिडकारून मीरा किचनमध्ये निघून गेली. ते पाहून निखिल लगेच उठून किचनमध्ये गेला आणि त्याने मीराचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याने मीराला कडकडून मिठी मारली. त्याच्या डोळ्यांमधून पश्चातापाचे अश्रू वाहत होत. त्यानंतर मीराने निखिलचे अश्रू पुसत पुसत त्याला शांत केले.)
x
Comments
Post a Comment