स्क्रोलिंग...!!!


 "काय! झाला ना सगळा अभ्यास व्यवस्थित? नीट पेपर लिही रे बाळा. इकडे तिकडे बघत टाईमपास करू नकोस. एकाच प्रश्नावर जास्त वेळ घालवू नकोस. पेन वगरे सगळं घेतलं आहेस ना रे? सोबत पेन एक्सट्रा घेऊन ठेव. परीक्षेला ऐन वेळी पेन संपून इकडे तिकडे मागण्यात टाइम जायला नको. आणि देवाचं नाव घेऊन जा जाताना म्हणजे पेपर नक्कीच चांगला जाईल" आई परीक्षेला जाण्याआधी आदित्यला सुचवत होती. "हो हो ! चल आता आशीर्वाद दे म्हणजे पेपर नक्कीच चांगला जाईल." असं म्हणत आदित्य आईला नमस्कार करण्यासाठी खाली झुकला. नंतर आईचा आशीर्वाद घेऊन आदित्य परीक्षेला जाण्यास निघाला.
 कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर नेहमीप्रमाणे आदित्य आणि त्याचे सगळे जण एकत्र जमले. पहिलाच पेपर ऍडव्हर्टिसिमेंटचा होता. पेपर चालू व्हायला अजून वेळ असल्याने सगळे मित्र मिळून झालेल्या अभ्यासाची पुन्हा एकदा उजळणी करत होते. थोड्या वेळाने पेपर सुरु होण्याची बेल वाजली. लगेच सगळ्या मित्रांनी आपल्या बॅग्स आपल्या वर्गाच्या बाहेर ठेवून पेपरसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी काढून घेतल्या आणि वर्गात प्रवेश केला. पेपर सुरु झाला. आदित्यने प्रश्नपत्रिका हातात घेतली आणि एकदा संपूर्ण प्रश्नपत्रिकेवर एक हलकी नजर टाकली. मुळातच ऍडव्हर्टिसिमेंट आदित्यचा आवडता विषय असल्याने तो त्या दृष्टीने तो भराभर एक एक पुरवण्या जोडत पेपर लिहत गेला. आदित्य इतक्या वेगाने पेपर लिहीत होता कि वेळेच्या पूर्वीच आदित्यचा पेपर संपूर्ण लिहून पूर्ण झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पेपर डोळ्याखालून घालून त्याने तो एकदा चेक केला आणि सुपरव्हाईजरकडे सबमिट केला. पेपर सबमिट करून झाल्यावर उद्याच्या पपेरची तयारी करण्यासाठी आदित्य आपली बॅग घेऊन घरी जाण्यास निघाला.
 घरी पोहोचल्यावर आदित्यने एक तासभर विश्रांती घेतली. विश्रांती पूर्ण झाल्यानंतर आदित्य उद्याच्या पेपरची तयारी करायला बसला. आजचा विषय मुळातच आदित्यच्या आवडीचा असल्याने त्याबद्दल आदित्यला विशेष काही चिंता नव्हती. पण उद्याचा पेपर हे आदित्यची एक आव्हान होतं. उद्या इकॉनॉमिक्स चा पेपर होता. इकॉनॉमिक्स हा विषय आदित्यसाठी इतर विषयांपेक्षा कठीण होता. तसं इकॉनॉमिक्सची देखील परीक्षा चालू होण्यापूर्वीच आदित्यने सुट्टीमध्ये नोट्स वगरे बनवून संपूर्ण तयारी करून ठेवली होतीच. त्यामुळे त्याला त्या दिवशी उद्याच्या पेपरविषयीची विशेष चिंता करण्याचे काही कारण नव्हते. आदित्य लगेच इकॉनॉमिक्सचे पुस्तक आणि आपण बनवलेले नोट्स घेऊन लगेच अभ्यास करायला बसला. रात्री वाजेपर्यंत आदित्यचा अर्ध्याहून अधिक अभ्यास पूर्ण करून झाला आणि तो जेवणासाठी आपल्या रूममधून बाहेर आला. बाहेर आल्यावर आईने आदित्यसाठी जेवण वाढायला घेतलं आणि आदित्यला जेवण देऊन "काय रे ! अभ्यास चालू आहे ना व्यवस्थित? इकॉनॉमिक्स कठीण जातो ना तुला? नीट अभ्यास कर. आणि जास्त टेन्शन घेऊ नकोस रे. नाही जास्त मार्क्स मिळाले तरी चालतील. तू तुझे प्रयत्न १००% लावतोयस ना म्हणजे झालं. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर." असं म्हणून आईने आदित्यला धीर दिला. "हो गं आई. अर्ध्याहून अधिक अभ्यास तर पूर्ण देखील झालाय. आता फक्त शेवटचा चॅप्टरचा अभ्यास राहिलाय. तो करून पुन्हा एकदा सगळ्या सिलॅबसची रिविजन केली म्हणजे झालं. आई बघ तू उद्याच्या पेपरमध्ये नाही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊन आलो तर." आदित्यने विश्वासाने आईला सांगितले. जेवण झाल्यावर आदित्य परत त्याच्या रूममध्ये निघून गेला. आदित्यने त्याचं पुस्तक आणि त्याचे नोट्स उघडले. आता फक्त शेवटचा चॅप्टर आणि त्यानंतरची रिविजन इतकंच बाकी होतं. त्यामुळे आदित्य आता टेन्शन फ्री होता. "आत्ताशी .३० वाजलेत. थोडा वेळ टाईमपास करून वाजता परत अभ्यासाला बसुयात. मग एका तासात शेवटचा चॅप्टर पूर्ण करून ११ वाजेपर्यंत उजळणी पूर्ण करून झोपायला आपण मोकळे." असा विचार सहज आदित्यच्या मनात येऊन गेला. त्याने आपल्या हातात घेतलेलं इकोनॉमिक्सचे पुस्तक आणि बनवलेले नोट्स बाजूला ठेवले आणि बाजूला असलेला त्याचा मोबाईल हातात घेऊन त्याने आपलं फेसबुक ओपन केलं आणि तो त्याची टाइमलाईन स्क्रोल करू लागला. आदित्यची फेसबुक वॉल पूर्णपणे मिम्सने आणि विविध प्रकारच्या फूड रेसिपीच्या व्हिडिओजने भरलेली होती. आदित्य एक एक मिम्स बघत स्क्रोल करत होता. मध्येच एखादा मिम आवडला तर शेअर करत होता. स्क्रोल करताना बऱ्याच मिम्स मध्ये आणि व्हिडिओजमध्ये आपल्या मित्र मैत्रिणींना टॅग करत होता. फेसबुकवर स्क्रोलळींग करणं हा नेहमीच आदित्यसाठी विरंगुळा असे. असे एक एक करून बरेच मिम्स आणि विडिओ आदित्य स्क्रोल करत होता. तितक्यात "आदित्य अभ्यास करतोयस ना? मी चालले आहे झोपायला. तू पण जास्त वेळ जागरण करू नकोस. लवकर झोपून घे." असं म्हणत बाहेरूनच आईने आदित्यला आवाज दिला. आईचा आवाज ऐकून स्क्रोल करण्यात मग्न झालेला आदित्य लगेच भानावर आला. लगेच त्याची नजर मोबाइलवरच्या टाइमवर गेली. तर त्याच्यात रात्रीचे ११ वाजलेले आदित्यच्या दृष्टीस पडले. तरी लगेच "हो हो आई. तू झोप. मी देखील झोपून घेतो आता थोड्यावेळात." असं सांगत आदित्यने आईला उत्तर दिलं. आदित्यने जरी इतक्या बिनधास्तपाने आईला उत्तर दिल असलं तरी आदित्यची मात्र अगदी चालणं उडून गेली होती. ते १० शेवटचा चॅप्टर आणि त्यानंतर शेवटचा एक तास म्हणजे ११ वाजेपर्यंत सगळ्याची पुन्हा एकदा उजळणी असं सहजरित्या आदित्यने आखलेलं गणित त्याच्या स्क्रोलिंगच्या नादात पूर्णपणे फेटाळलं गेलं होत. शेवटी ११ वाजता भरभर त्याने शेवटचा चॅप्टर करायला सुरुवात केली. टेन्शन फ्री असलेलं आदित्यचं डोकं आता ते घडाळ्यातले ११ बघून चक्रावलं गेलं होतं. आणि त्यामुळे त्याचा आता उरलेल्या त्या शेवटच्या चॅप्टरचा आभ्यासदेखील व्यवस्थितपणे करायला जमत नव्हतं. तो सारखा एक वेळ त्याने बनवलेल्या नोट्स मध्ये आणि एक वेळ पुस्तकात बघून समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण उद्याच्या पेपरच्या टेन्शनमुळे काही केल्या त्याचं लक्ष केंद्रित होतं नव्हतं. बघता बघता १२ वाजले. आता आदित्यला झोप येऊ लागली. काही केल्या त्याचे डोळे आता वाचन करण्यास तयार होतं नव्हते. तरी आदित्य जबरदस्ती कसाबसा अभ्यास करत होता. हळू हळू आदित्यला डुलक्या येऊ लागल्या आणि शेवटी नकळतच आदित्य झोपी गेला.
 दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आदित्यला जाग आली. काल अभ्यास काहीच नीट झाल्याने आदित्यचा चेहरा एक्दम पडलेला होता. अंघोळ वगरे करून आदित्य नेहमीप्रमाणे आईच्या नमस्कार करण्यासाठी खाली झुकला. नेहमीप्रमाणे आईने "नीट लिही पेपर. घाबरून जाऊ नकोस. मी काल जे तुला सांगितलं ते लक्षात आहे ना?" असं म्हणून आदित्यला आशीर्वाद दिला. आदित्यने त्या पडलेल्या तोंडानेच "हं" म्हणून आईला उत्तर दिलं आणि तो कॉलेजला जाण्यास निघाला. कॉलेजमध्ये गेल्यावर नेहमीप्रमाणे त्याचे मित्र त्याला रिव्हिजनसाठी बोलावू लागले. मात्र आपली मनस्थिती नसल्याने आदित्य शांतपणे एका कट्ट्यावर जाऊन एकटाच तोंड पाडून बसला. तितक्यात आदित्यच्या वर्गातला एक मुलगा समीर तिथे आला आणि काय "आदित्य इतका तोंड पाडून का बसलाय? अभ्यास नाही झाला वाटतं. अरे इतका घाबरतोस कशाला? चल माझ्यासोबत." असं म्हणत तो आदित्यला कॉलेजच्या समोर असलेल्या स्टेशनरीच्या दुकानात घेऊन गेला. आणि दुकानात जाऊन त्याने तेथील दुकानदाराला "राजुशेठ कुठे आहेत?" असं विचारलं. "शेठ घरपे है." दुकानदाराने उत्तर दिलं. "शेठला फोन करून सांग कि सकाळी समीरने ज्या मिनीझेरॉक्स सांगितल्या होत्या त्याची अजून एक कॉपी समीरने मागितली आहे." असं समीरने त्या दुकानदाराला सांगितलं.  लगेच दुकानदाराने मालकाला फोन केला आणूनि समीरने सुचवल्याप्रमाणे त्याला सांगितले. त्यानंतर मालकाच्या सांगण्यावरून दुकानदाराने लगेच मिनिझेरॉक्सचे दोन बंच काढून एक समीरच्या हातात आणि एक आदित्यच्या हातात दिला. बंच मिळाल्यावर लगेच समीर आदित्यला घेऊन कॉलेजच्या मागे गेला आणि त्याने त्या मिनी झेरॉक्सची घडी घालून त्या सगळीकडे लपवायला सांगितल्या. तितक्यात पेपर सुरु होण्याची बेल वाजली. लगेच आदित्यने त्या सगळ्या मिनिझेरॉक्स सगळीकडे लपवल्या आणि तो पेपर लिहिण्यास बसला. प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यावर नेहमीप्रमाणे आदित्यने एक हलकी झलक त्या प्रश्नपत्रिकेवर घातली. एवढा अभ्यास करूनही उजळणी झालेली नसल्याने आदित्यला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर आठवत नव्हतं. पण आदित्यकडे मिनिझेरॉक्सच्या रूपात सर्व उत्तरांचा खजिना असल्याने त्याला विशेष काही घाबरण्याचे कारण नव्हते. आदित्यने सुपरव्हाईजरचे लक्ष नसलेलं पाहून हळूच पहिल्या प्रश्च्या उत्तराची एक चिट्ठी बाहेर काढली आणि ती प्रश्नपत्रिकेच्या खाली अडकवून तो लिहू लागला. तितक्यात आदित्यच्या मागे बसलेला मुलगा काहीतरी कुजबुज करत असल्याने लगेच सुपरव्हाईजरचे लक्ष त्याच्याकडे गेले. ते त्याच्या जवळ गेले आणि त्याला ओरडू लागले. त्याला ओरडत असताना त्यांची नजर कॉपी करत असणाऱ्या आदित्यकडे गेली. लगेच आदित्यच्या बेंचजवळ येऊन सरांनी त्याचा पेपर काढून घेतला आणि त्याच्या सगळ्या मिनिझेरॉक्स पकडून घेऊन त्याला वर्गातून मधून हाकलवून लावले. आदित्यचा तो पहिलाच प्रश्न चालू होता. नेमका तेव्हाच सरांनी पेपर काढून घेतल्यामुळे आदित्य इकॉनॉमिक्समध्ये नापास होण्याची १००% शक्यता होती.
 इकडे आदित्य वर्गातून बाहेर आला. आधीच आपल्याला पहिल्याच प्रश्नाला पकडल्यामुळे आपण नापास होणार हे त्याला माहित होतं त्यात आपल्याला अश्या अवस्थेत पकडल्यामुळे आता सर्व शिक्षकांच्या नजरेतून आपण उतरून गेलो ह्या विचाराने आदित्यचं डोकं पार चक्रावून गेलं होतं. कॉलेजमधून घरी जाईपर्यंत हाच विचार आदित्यच्या मनात सारखा सारखा घोळत होता. आपण काल रात्री त्या फालतू स्क्रोलिंगमध्ये आपला मौल्यवान वेळ गमावला ह्याचा त्याला आता पश्चाताप होतं होता. त्या फालतू स्क्रोलिंगमुळे आपण तोंडापर्यंत नेलेला घास भिरकावून लावला हे त्याला कळून चुकलं होतं. घरी आल्या आल्या पहिले तो आपल्या रूममध्ये गेला. त्याने आपली बॅग ठेवली. आणि समोर असलेला फोन हातात घेतला आणि त्यातलं फेसबुक अँप्लिकेशन डिलिट मारलं. आणि तो फ्रेश होऊन लगेच उद्याच्या पेपरच्या  अभ्यासाला बसला.
 वास्तविक पाहता आदित्यला सर्वात कठीण जाणाऱ्या विषयाचादेखील त्याने मेहनत घेऊन अर्ध्याहून अधिक अभ्यास पूर्ण केला होता. आणि पुढील अभ्यासाचे वेळापत्रकदेखील ठरवले होते. मात्र सोशल मीडियाचा फक्त एक विरंगुळा म्हणून वापर करता त्याच्या व्यसनात वाहून गेल्यामुळे आदित्यने त्याचा मौल्यवान वेळ गमावला आणि त्यामुळे त्याचं संपूर्ण वेळेचं गणित चुकलं. आणि ह्या सर्वांचा परिणाम त्याला सुचणाऱ्या दुर्बुध्दीवरून सुरु होऊन पूर्ण मेहनत घेतलेली असूनही त्या विषयात नापास होईपर्यंत सर्वत्र दिसून आला. आज आदित्यसारखेच अनेक लोक स्क्रोलिंगला फक्त एक विरंगुळा म्हणून हाताळता स्क्रोलिंगचे गुलाम होतं आहेत आणि त्यांच्याकडे असणारा आमूलाग्र वेळ व्यर्थ घालवत आहेत. आदित्यप्रमाणेच आपली मेहनतदेखील ह्या स्क्रोलिंगमुळे पाण्यात जाऊ नये आणि त्याचे त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू नयेत ह्यासाठी लवकरात लवकर आपल्याला लागलेल्या ह्या स्क्रोलिंगच्या व्यसनातून मुक्त होण्याची गरज आहे. 



Comments

Popular posts from this blog

ज्याचा त्याचा व्हॅलेंटाईन...❤️